तिसरी मंझील
पहिलेपणाची नवलाई किंवा अपुर्वाई ही शब्दातीत असते! पहिलं प्रेम, पहिला पगार, पहिली गाडी, पहिला स्पर्श…..अगदी थेटच बोलतो, रागावू नका, पहिलंवाहिलं चुंबन…..य गोष्टी अशा असतात की त्यांच्या आठवणी नि अनु्भूती आयुष्यभर चिरतरूण आणि टवटवीत असतात.
माणसाच्या आयुष्यात त्यानंतर अनेक उलथा-पालथी होतात, घडामोडी घडतात..कधी तो आणखी कोणाच्या प्रेमात पडतो, नविन चांगली नोकरी त्याला मिळते. तो आणखी मोठी गाडी विकत घेतो…पण तरीही त्याच्या मनाच्या एका कोपरात त्याच्या पहिलेपणाची आठवण त्याला साद घालतच असते.
व्यावसायिक कलावंताच्या आयुष्यात त्याला मिळालेल्या पहिलंवाहिल्या संधीचे आणि यशाचे स्थान हे असेच अविस्मरणीय असते. यशाची उत्तुंग शिखरे पादाक्रांत केल्यावर आणि अपुर्व नावलौकिक मिळाल्यानंतरही तो कलावंत पहिल्या संधीला आयुष्यात कधीही विसरत नाही.
आपल्या अतिशय हटके अशा संगीतशैलीने चित्रपटसंगीतामधे स्वत:चे पंचमयुग आणणारा राहुलदेव बर्मनच्या आयुष्यातसुद्धा असेच महत्व ’तिसरी मंझील’ या चित्रपटाला आहे. आता तुम्ही म्हणाल का बरे? छोटे नवाब का नाही? तो तर पंचमचा पहिला चित्रपट, स्वतंत्र संगीतकार म्हणून त्याचे पदार्पण!
खरे आहे, १९६१ साली मित्रवर्य मेहमूदच्या या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर ’संगीतकार राहुलदेव बर्मन’ अशी अक्षरे उमटली. ’घर आजा घिर आयी’ सारखं लताचं अप्रतिम सोलो आणि अरेबियन स्टाईलचं लता-रफीचं मस्त युगुलगीत – मतवाली आखोवाले या दोनच गाण्यांनी आपल्या आगमनाची आणि आपल्या वेगळेपणाची झलक पंचमने चित्रजगताला दाखवून दिली होती.
६० च्या दशकामधे हिंदी चित्रपटसंगीत आपल्या वैभवाच्या परमसीमेवर होते आणि पंचमची गाठ शंकर-जयकिशन, ओ.पी.नय्यर, मदनमोहन, नौशाद, सी.रामचंद्र, रोशन, सलील चोधरी आणि दस्तुरखुद्द स्वत:चे वडिल एस.डी.बर्मन यांच्याशी होती. या प्रत्त्येक संगीतकाराची स्वत:ची संगीतशैली होती आणि या महारथी संगीतकारांच्या मांदीयाळीमधे स्वत:चे स्वतंत्र रोपटं रुजवण्याची अवघड कामगिरी त्याला पार पाडायची होती.
१९६१ च्या छोटे नवाब नंतर १९६५ पर्यंत मधली ४ वर्षे पंचमला एकही चित्रपट मिळाला नाही. या मधल्या काळात तो आपल्या वडिलांकडेच सहाय्यक म्हणून काम करीत राहिला. ’जिगरी दोस्त’ मेहमूदने ’भूत बंगला’ चं संगीत पुन्हा एकदा पंचमला दिलं आणि पुन्हा एकदा लताचं ’ओ मेरे प्यार आजा’ सारखं सुंदर गाणं, किशोरचं अर्ध्या रात्री जागं करणारं – जागो सोनेवालो आणि शास्त्रीय बाजाची गाणी गाणारा मन्ना डेंच्या आवाजामधे झींग आणणारं – आओ ट्विस्ट करे…अशी गाणी देऊन पंचमने पुन्हा एकदा आपले वेगळेपण अधोरेखित केले. त्यानंतर मेहमूदचाच ’पती पत्नी’ आणि फिरोज खानचा ’तिसरा कौन’ हे चित्रपट त्याने केले पण फारसा काही उपयोग झाला नाही. चित्रपटक्षेत्रात यश मिळवायचं, आघाडीच्या संगीतकारांत स्थान मिळवायचं तर मोठ्या बॅनरचा, आघाडीच्या नायकाचा सिनेमा संगीतासाठी मिळायला हवा किंवा संगीतप्रधान सिनेमा मिळायला हवा, पण ते मिळणार कसे? कारण दिलीप-देव-राज-शम्मी-राजेंद्रकुमार यांच्यासारख्या मोठ्या स्टार्सचे सिनेमे शंकर-जयकिशन, ओ.पी., नौशाद, एस.डी. यांच्याकडे होते आणि इतरांसाठी मोठी स्पर्धा होती.
दुसरी गोष्ट म्हणजे एस.डी.बर्मन स्वत: दर्जेदार आणि लोकप्रिय संगीत देत असताना, त्यांच्यासमोर त्यांच्या मुलाला कोण संगीतकार म्हणून घेण्याची रिस्क घेणार हा प्रश्न होताच. मेहमूदने ही संधी पंचमला दिली पण तो पडला एक विनोदी अभिनेता. त्य पलीकडे दुसरी मोठी संधी पंचमला आता हवी होती आणि यासाठी त्याला अशी एक व्यक्ती हवी होती की जिला पंचमच्या गुणवत्तेविषयी खात्री असेल आणि जी त्याला मोठा चित्रपट देऊ शकेल. आयुष्यामधे कोणत्याही क्षेत्रामधे नुसती गुणवत्ता असुन चालत नाही, तर त्याचे महत्व ओळखणारा व त्याला योग्य ती संधी देणारा गॉडफादर ही लागतो.
हा गॉडफादर पंचमला मिळाला तो गोल्डी उर्फ विजय आनंदच्या रुपाने! ’नौ दो ग्यारह’ पासून ’नवकेतन’ मद्ये काम करताना सचिनदांबरोबर गाण्यांच्या सिटींग्जच्या निमित्ताने गोल्डीची पंचमबरोबर अनेकदा भेट व्हायची. दादांबरोबर सहाय्यक म्हणून काम करताना पंचमचे गाण्यामधील सर्जनशील योगदान, नाविन्यपूर्ण सूचना, वेगळा विचार करायची पद्धत…या गोष्टी गोल्डीने त्याच्या सराईत नजरेने टिपल्या होत्या. समवयस्क असल्याने त्याची छान गट्टी जमायची आणि त्या मैत्रीतुन पंचमचे वेगळेपण त्याच्या नजरेत भरले होते.
एक प्रगल्भ दिग्दर्शक म्हणून गोल्डीचा नावलौकिक दिवसेंदिवस वाढत होता, त्यामुळे ’नवकेतन’ च्या बाहेरही त्याने दिग्दर्शक म्हणून काम करावे अशी अनेक निर्मात्यांची इच्छा होती. एक दिवस निर्माते नासिर हुसेननी त्याच्यासमोर असा प्रस्ताव ठेवला. ’जब प्यार किसीसे होता है’ च्या सुपरहिट यशानंतर त्यांना देवआनंद बरोबर दुसरा सिनेमा करायचा होता आणि हा सिनेमा स्वत: दिग्दर्शित न करता तो गोल्डीने करावा अशी त्यांची इच्छा होती. देवाआनंदच हिरो असल्यामुळे आणि मनाप्रमाणे काम करायची मुभा असल्याने देवशी विचारविनिमय करुन गोल्डीने आनंदाने ह प्रस्ताव स्वीकारला आणि त्याला पंचमची आठवण झाली. या नव्या चित्रपटाद्वारे आपल्या दिग्दर्शनाखाली आपण पंचमला सादर करु असे त्याने ठरवले आणि नासिरचा होकारही घेतला.
ही बातमी समजल्यावर पंचमच्या आनंदाला पारावार उरला नाही. कारण देवाआनंद सारख्या मोठ्या स्टारचा आणि नासिर हुसेन सारख्या बड्या निर्मात्याचा चित्रपट त्याला प्रथमच मिळत होता आणि तेही विजय आनंद सारख्या संगीताची उत्तम जाण असलेल्या दिग्दर्शकाबरोबर! पंचमसाठी ही सुवर्णसंधी होती…
कथा-कल्पना तयार झाली, गाण्याच्या जागा तयार झाल्या आणि मोठ्या उत्साहाने पंचम झपाटून कामाला लागला. देव हिरो असल्याने आणि नवकेतन मधे खूप काम केले असल्याने ’त्या’ स्टाईलने संगीत देणे फारसे अवघड नव्हते. त्यामुळे देवची रोमॅंटिक इमेज समोर ठेऊन त्याने म्युझिकवर विचार करायला सुरुवात केली. पण ’हाय रे किस्मत’! दुर्दैव पुन्हा त्याच्या आड आले.
एका पार्टीमधे चित्रपट नायकावर चालतो की दिग्दर्शकावर या वादाचे रुपांतर पाह्ता पाहता टोकाच्या भांडणामधे झाले आणि एकमेकांचे जानी दोस्त असलेले नासीर हुसेन आणि देव आनंद यांच्यामधे कायमची दरी पडली.
देवने ’तिसरी मंझिल’ मधे आपण काम करणार नाही असे जाहिर केले आणि इकडे पंचमची अवस्था बिकट झाली. नासिरने याआधी शम्मी बरोबर ’तुमसा नही देखा’ केल्यामुळे त्यांची छान जोडी जमली होती. त्यामुळे त्याने गोल्डीला शम्मीचा पर्याय दिला व गोल्डीनेही तो स्वीकारला. पण त्यामुळे पंचमला वाटले की आता आपली ही संधी गेली कारण शम्मीच्या चित्रपटांचे संगीतकार होते शंकर-जयकिशन!
आणि तसेच झाले. शम्मीने एस.जे. चा आग्रह करायला सुरुवात केली. पंचमसारख्या नवोदित संगीतकाराबरोबर काम करायची रीस्क तो घ्यायला काही केल्या तयार होईना. याला समजावयाचे कसे असा प्रश्न गोल्डीपुढे पडला आणि हुशार गोल्डीने विचारपूर्वक एक तोडगा काढला.
तो शम्मीला भेटला व म्हणाला, ’ हे बघ शम्मी, तुझा एस.जे. चा आग्रह मला पटतोय, समजतोय. पण एक गोष्ट लक्षात घे, तू सुद्धा कधीतरी नवोदित होतास आणि तुलाही कुणीतरी रिस्क घेऊन ब्रेक दिलाच ना? पंचम एक गुणी संगीतकार आहे, मला त्याच्या गुणवत्तेविषयी खात्री आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तू त्याने केलेल्या चाली ऐक, त्या जर तुला नाही आवडल्या तर तुझ्या म्हणण्याप्रमाणे आपण एस.जे. ना घेऊयात, मी तुला अडवणार नाही’.
गोल्डीचा हा तोडगा शम्मीने मान्य केला आणि मग गोल्डीने काही दिवसांनी शम्मी आणि पंचमची बैठक ठरवून टाकली. आता खरी पंचमच्या सर्जनशीलतेची कसोटी होती. शम्मी चित्रपटात आल्यामुळे संगीताचा सगळा बाजच बदलून जाणार होता. देव आणि शम्मी ही गाण्यांच्या सादरीकरणाची दोन टोके होती. एक हळुवार रोमॅंटिक तर दुसरा रंगेल-धसमुसळा! देवची शैली पंचमच्या परीचयाची होती तर शम्मीची स्टाईल त्याच्यासाठी एकदम नविन…त्यात शम्मीचे शंकर-जयकिशन लाडके! त्याच्यावर त्यांचा प्रभाव! तो पुसुन टाकुन त्याला आपल्या चाली कशा काय आवडतील यावर पंचमने विचार सुरु केला. गोल्डीने सर्वांच्या विरोधात जाऊन पंचमसाठी ही संधी आणली होती. आणि पंचम साठी ही सुवर्णसंधी होती. त्याच्यातल्या ’जिनीयस’ संगीतकाराला हे एक आव्हान होते. आणि ती संध्याकाळ आली.
मनोहरी, मारुती अशा निवडक साथीदारांना पंचमने बरोबर घेतले होते. शम्मी, गोल्डी सगळी मंडळी जमली. खाण्या-पिण्याची जय्यत तयारी होतीच. थोड्या वेळाने शम्मीने गाण्याची फर्माईश केली. तो जरा अनिच्छेने लांबच बसला होता. पंचमने हार्मोनियम पुढ्यात घेऊन त्याला एक चाल ऐकवली. रिदमची आणि संगीताची उत्तम समज असलेल्या शम्मीचे कान ती चाल ऐकून टवकारले गेले. टुणकन उडी मारून तो पुढे आला आणि ते पुन्हा ऐकायची फर्माईश केली. ती ’हटके’ चाल ऐकून तो खुळावला होता आणि ते गाणं होतं – ओ हसीना जुल्फोवाली जाने जहा…
’आजा आजा’ ची जगावेगळी चाल ऐकून तर तो वेडाच झाला. एखाद्या गाण्याची चाल अशी कशी असू शकते या विचारात तो पडला होत. आतापर्यंत कधीही न ऐकलेलं आणि कल्पना न केलेलं काहीतरी अद्भुत त्याच्यासमोर घडत होतं…त्याच्या आवडत्या पहाडी धुनची फर्माईश त्याने पंचमला केली आणि पंचमने त्याला ऐकवलं – ’दिवाना मुझसा नही…’
बस! अलिप्तपणे आणि काहीशा अनिच्छेने भेटीला आलेल्या शम्मीने आनंदाने पंचमला कडकडून मिठी कधी मारली ते त्याला समजले नाही. खुष होऊन त्याने गोल्डीला त्याच्या चॉईसची दाद दिली आणि तिसरी मंझील चा संगीतकार म्हणुन अधिक्रुतरीत्या पंचमची निवड झाली.
अभिनंदनाचा पहिला फोन पंचमला केला तो संगीतकार जयकिशन ने! याला म्हणतात निकोप स्पर्धा आणि खिलाडुव्रुत्ती!
गाण्यांची अरेंजमेंट करताना आपल्या बासु, मनोहरी, मारुती या कल्पक साथीदारांच्या मदतीने पंचमने अक्षरश: बहार उडवुन दिली. पाश्च्यात्त्य संगीतातल्या जॅझ चा सुंदर वापर त्याने केला. ड्रम्स चे अप्रतिम सोलो पीसेस – जे ’आजा आजा’, ’ओ हसिना’, ’तुमने मुझे देखा’ मधे ऐकायला मिळतात. रिदम मधील नावीन्यता, ओ हसिना मधला लक्षात राहणारा ट्रॅंगलचा आवाज, याच गाण्यामधे तीन अंतर्यांसाठी शम्मीच्या हातात दिलेली सॅक्सोफोन, ट्रंपेट आणि ट्रंबोन ही तीन वेगळी वाद्ये, अंतर्याला सूर बदलणारी ’तुमने मुझे देखा’ ची अतिशय मेलोडियस आणि अनोखी चाल, गायकाच्या श्वासाची परीक्षा घेणार्या ’आजा आजा’ आणि ’देखिए साहेबो’ अशा जगावेगळ्या चाली…
खुप काही नवीन असे पंचमने रसिकांसमोर आणले. आशा-रफी सारख्या कसलेल्या गायकांनाही सुरुवातीला हा नविन प्रकार फारसा भावला नव्हता पण त्यांनीही नंतर या कल्पकतेला मनापासून दाद दिली. शम्मीतर उत्साहाने गाण्यांच्या रेकॉर्डिंगला हजर होता कारण रफीसाहेबांनी गायलेलं आता आपण पडद्यावर कसे सादर करू या विचारांनी तो झपाटलेला असे.
शैलेंद्र, हसरत आणि आनंद बक्षी यांच्या बरोबर काम केल्यानंतर ’तिसरी मंझील’ च्या निमित्ताने पंचमने मजरुह सुलतानपुरीं बरोबर प्रथम काम केले आणि हे सूर पुढे अनेक फिल्म्स मधे जुळले.
पंचमने संगीतबद्ध केलेल्या या अनोख्या गीतांमधे आपल्या नशील्या, दिलखेचक अदाकारीने शम्मीने आणि आपल्या अफलातुन कल्पक चित्रीकरणाने गोल्डीने अनोखे रंग भरले. अक्षरश: चार चांद लावले.
’तिसरी मंझील’ रिलीज झाल्यावर पुढे काय झाले तेही सांगायची गरज नाही. शमीच्या संपूर्ण चित्रपट कारकिर्दीमधे ’तिसरी मंझील’ हा चित्रपट सर्वार्थाने खूप उजवा आणि वेगळा वाटतो हे माझे आवडते मत आहे.
पंचमला एका मोठ्या ब्रेकची गरज होती आणि ’तिसरी मंझील’ च्या रुपाने ती पूर्ण झाली. १९६६ च्या या रिलीजनंतर बहारोंके सपने, अभिलाषा, पडोसन, प्यार का मौसम, वारिस असा प्रवास करत ’पंचम एक्सप्रेस’ ७० च्या दशकामधे पोहोचली आणि मग कटी पतंग, अमरप्रेम असा प्रवास करत आणि लोकप्रियतेची स्टेशन्स पार करत करत ती बुढ्ढा मिल गया, कारवा पार पाडत १९७१ च्या ’हरे राम हरे क्रुष्ण’ पर्यंत पोहोचली…आणि तमाम तरुणाईला ’दम मारॊ दम’ च्या नशेवर झुलवत तिने पंचमचा ट्रेंड आणला…’पंचमयुग’ आणले…
आपल्या आयुष्यात पुढे उत्तुंग व्यावसायिक यश पंचमने पाहिले आणि अनुभवले..पण व्यावसायिक यश कशाला म्हणतात हा सुंदर अनुभव त्याला ’तिसरी मंझील’ ने दिला. पंचम सारखंच उत्तुंग यश मिळवलेल्या संगीतकार रवी आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी त्यांच्या घरांची नावे काय ठेवली होती माहिती आहे? – ’ वचन’ आणि ’पारसमणी’….त्यांचे पहिले गाजलेले चित्रपट! आयुष्यातल्या पहिल्या यशाची महती ही अशी असते!!
चंद्रशेखर महामुनी