चंदन का पलना
चंदन का पलना : एका सांगीतिक आंदोलनाचे अवलोकन :
मराठी मध्ये एक म्हण आहे. ‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’
राहुल देवबर्मन उर्फ पंचम च्या बाबतीत हीच म्हण ‘पंचम चे पाय पाळण्याबाहेर दिसतात’ अशी बदलावी लागेल. ज्याने संगीतातील रूढींच्या चौकटी कधी जुमानल्या नाहीत त्याने ( अगदी म्हणीत सुद्धा) पाळण्याच्या चौकटी का मानाव्यात ? चंदन का पलना 1967 साली प्रदर्शित झालेला. प्रदर्शन अनुक्रमाने पाहिलं तर त्याचा हा सातवा चित्रपट. ज्याचा नुकताच आलेला ‘तिसरी मंझिल’ हा सर्वार्थाने Trend-setter ठरला आणि ज्याचा पाळणा संगीतातील साक्षात लक्ष्मी-नारायणाचा जोडा असलेल्या आई-वडिलांनी जोजवला त्याच्या बाबतीत सांगीतिक नवखेपणाचा प्रश्न येणे शक्यच नाही. तरीही, पंचमच्या २९२ चित्रपटाच्या कारकीर्दीच्या हिशोबाने हे बालपणच म्हणावे लागेल. बाळसुलभ प्रयोगशीलतेची कास मात्र पंचमने शेवटपर्यंत सोडली नाही. त्याच प्रयोगशीलतेच्या निकषावर हा सिनेमा संगीतप्रेमींसाठी अगदी सोन्याची खाणच ठरावा.
लेखाचा हेतू :
एक गोष्ट सुरवातीलाच स्पष्ट करणे मला आवश्यक वाटते की हे एका साध्या पंचम चाहत्याचे लिखाण आहे ज्याला संगीतातले ओ की ठो कळत नाही. मुळात संगीतात ओ की ठो असतात की नाही हे पण माहीत नाही. त्यामुळे हे विश्लेषण (analysis) नसून लेखाच्या शीर्षकात लिहिल्याप्रमाणे अवलोकन (review) आहे. असे अवलोकन का असा प्रश्न काहींना पडेल ते अशासाठी की सहसा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर वर्तमानपत्रात जी समीक्षा येते त्यात त्यातल्या संगीताला दोन,फार फार तर तीन ओळींचे स्थान मिळते. ही परंपरा त्या जमान्यापासून जेव्हा संगीताभोवती कथा गुंफलेली असायची तेव्हापासून सुरू आहे त्यामुळे आताच्या सिनेमा विषयी बोलायची तर सोयच नाही. शिवाय संगीताचा आढावा घेणारे जे लेख किंवा कार्यक्रम असतात त्यात एकाच सिनेमाच्या संगीताविषयी सविस्तर चर्चा बघायला किंवा ऐकायला मिळणे हा योग जरा दुर्मिळच. बहुतेक लेखांमध्ये खेळायच्या पत्त्यांचा धरतात तसा बऱ्याच गाण्यांचा एकत्र पंख आपल्यासमोर धरला जातो त्यातून लेखक/लेखिका संगीतात किती ज्ञानी आहे हेच जास्त कळतं. एकाच गाण्यात आणि album मध्ये निवांत डुंबत राहण्याचा अनुभव देणारे लेख तसे कमीच. त्यामुळे वाटले आपणच का नाही करायचा प्रयत्न ?
थोडक्यात काय तर पुराणच लावणार आहे म्हणा ना !
पण मग पु.लं. च्या असा मी असामी मधल्या नायकाला “पण का हो , ऐकतील/ वाचतील का हो लोक माझं पुराण ?” असा प्रश्न पडला. पण नंतर त्याच लेखात त्याला एक सल्ला मिळतो “हे पहा, पुराणिकबुवांनी पुराण सांगत जावं, कोणी ऐकायला आहे किंवा नाही याची चिंता करू नये.” मी पण हीच सल्ला वजा स्फूर्ती घेऊन पंचमचं आख्यान लावतोय. त्यामुळे ज्यांना अशा लेखात रस नसेल किंवा ज्यांना संगीतातल्या तांत्रिक (राग, ताल प्रकार वगैरे ) बाबींची किंवा नुसत्याच पडद्यामागच्या गाव-गप्पांची अपेक्षा असेल त्यांनी आत्ताच उतरून घ्यावं.
पुढचा पूर्ण लेख हा पंचम या स्वयंप्रकाशित ताऱ्याला केंद्रस्थानी धरून लिहिलेला आहे.
व.पु.(काळे) म्हणतात त्याप्रमाणे, “उरलेला लेख उरलेल्यांसाठी”.
पण मग ‘चंदन का पलना’च का ?
अशा नावाचा पंचमचा चित्रपट आहे ? असा प्रश्न पडणं साहजिकच आहे. या चित्रपटाच्या संगीताचा मंद दरवळ तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी तुम्हाला ‘शोले’, ‘मेहबूबा’ ‘तीसरी मंझिल’ सारख्या चित्रपटांची आँधी पार करावी लागेल. एका मोठ्या पुस्तकांच्या दुकानाच्या सुरवातीलाच नाही का best seller पुस्तकांचे racks असतात, बरीचशी गर्दी तिथेच घोटाळत असते पण जे खरंच दर्दी असतात ते हे पार करून आतल्या भागातली पुस्तकं चाळताना दिसतात. तसाच हा आतल्या भागात ठेवलेला चित्रपट. थोडे कष्ट घेतल्याशिवाय न सापडणारा हा गीत-संग्रह. लताजींचे दोन एकल गीतं (solo ) सोडली तर बाकीची फारशी म्हणजे रूढार्थाने लोकप्रिय नाहीत. एकतर ‘छोटे नवाब’,’तीसरी मंझिल’,’पडोसन’ सारखे झगझगीत अपवाद सोडले तर साठच्या दशकातील बरेचसे चित्रपट आणि त्यामुळे पंचमची त्यातील गाणी ही सत्तर च्या दशकाच्या तुलनेत दुर्लक्षित राहिली. हे दशक खरे तर पंचमच्या दृष्टीनं चित्रपटसृष्टीत स्थिर होण्याचे. त्याने या दशकातल्या प्रत्येक चित्रपटांना भरपूर वेळ दिला असंच प्रत्ययाला येतं. त्यातून किशोर,लता,आशा,रफी यांचे स्वर अजून तरुण. त्यामुळे दर्दी पंचम चाहत्यांना ही गाणी dew-fresh म्हणजे दवबिंदूसारखी ताजी आणि टवटवीत वाटतात.
ह्या गीत-संग्रहामधील विविधता तर बघा : पुरुष गायकांत रफी, मन्ना डें सारखे हरहुन्नरी गायक, गायिकांमध्ये तिन्ही मंगेशकर भगिनी. गाण्यांच्या गायकांच्या प्रकारांत पण तेच. वर उल्लेख केल्याप्रमाणे दोन लताजींचे solo, एक रफी यांचा solo, लता-उषा चे स्त्री द्वंद्व गीत , रफी-मन्ना डे यांचे पुरुष द्वंद्व गीत आणि रफी-आशा यांचं मिश्र द्वंद्व प्रणय गीत आणि अतिशय उच्छृंखल ( चांगल्या अर्थी) अशी दोन मन्ना डे-आशा गीतं. गाण्यांचे प्रकार (genre) म्हणले तर ‘तुमहें देखा है’ सारखी गज़ल आहे. एका टोकाला भारतीय संगीत आणि
नृत्याविष्कारावर आधारित गीतं ( ‘ओ गंगा मैय्या’ आणि ‘नीर तत धंग ‘) आहेत तर दुसऱ्या टोकाला पाश्चात्य संगीतावरची दोन थिरकती गाणी ( ‘मस्ताना होए’ आणि ‘बात करते हो’) सुध्दा आहेत. या मध्ये कुठे तरी असणारी light music च्या प्रकारात मोडणारी ‘किस कारन’, ‘जुल्फों को’ आणि या सर्वांवर काडी करणारे अवघड ताल प्रकारावर कसरत करणारं लताजींचं ‘शराबी मेरा नाम’.
इतकी विविधता की किशोर कुमार यांची अनुपस्तिथी सुद्धा जाणवू नये. हा संगीतमय पाळणा त्यामुळेच तुम्हांला कर्ण-सुखद रित्या झुलवत चित्रपटाचे नाव सार्थ करतो या सगळ्यांची सुरुवात एका छान आणि हृद्य अशा शीर्षक संगीताने होते जी चित्रपटाचा विषय आणि mood थोडक्या वेळात आणि अभिनव पद्धतीने मांडण्याचे पंचमचे कसब अधोरेखित करणारी सुद्धा ठरते.
पण त्या आधी चित्रपटांच्या कथेविषयी थोडं, आणि थोडंसंच. हो, ह्या वेळी उलटं.
चित्रपटाची कथा आणि मेहमूद भाईजान :
ह्यातले मुख्य कलाकार म्हणजे धर्मेंद्र , मीना कुमारी, मेहमूद, मुमताज , धुमाळ, दुर्गा खोटे, नासिर हुसेन. धर्मेंद्र आणि त्यांची आई दुर्गा खोटे मोठ्या खानदानातले.. सिनेमातल्या त्या काळातल्या कुठल्याही आई प्रमाणे तिचे स्वप्न म्हणजे तिच्या मुलाच्या बाबूजींना (तसबिरीतले) दिलेल्या वचनानुसार घराण्याचा रिकामा चंदन का पलना’ पुन्हा झुलवायचे. धर्मेंद्र आणि मीना कुमारीचे प्रेम व त्यांचे लग्न. सासूच्या सुनेकडून वारसाच्या अपेक्षा आणि ती पूर्ण न झाल्यामुळे मीना कुमारीला आत्महत्येच्या टोकापर्यंत ढकलणारे दडपण. त्यातून तिला कसा मार्ग सापडतो आणि ती कसा अनोखा त्याग करून हे स्वप्न पूर्ण करते त्याची कथा म्हणजे हा चित्रपट.
आता यात मेहमूद कुठे ? तर ते म्हणजे धर्मेंद्रच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा. कलकत्त्यातून मुंबईत आलेले पक्का बंगाली. त्याला साथ ( ??) देणारी मुमताज आणि तिचे नृत्य-संगीत वेडे वडील धुमाळ.
पंचमला चित्रपटांत पहिला ब्रेक देणारे मेहमूद ह्यांचा पंचमच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत फार महत्त्वाचा वाट होता. ते गंमतीने सांगतात की “पंचम जेव्हा माझ्या गाडीत बसायचा तेव्हा खिडकीतून हात बाहेर काढून गाडीच्या टपावर बोटांनी तबला वाजवायचा. हा त्रास थांबवण्यासाठीच मी त्याला संगीतकार म्हणून चित्रपट दिला”.
आता एक खरा आणि जिवलग मित्रच अशी गोष्ट सांगू शकतो. मेहमूद फक्त छोटे नवाब देऊन थांबले नाहीत. त्यांनी त्याला भूत बंगला आणि पती पत्नी सारखे चित्रपट सुद्धा दिले. पंचमच्या पहिल्या सात चित्रपटांतला मेहमूद यांचा हा चौथा चित्रपट. यावरूनच पंचम विषयी मेहमूद यांना वाटणारा विश्वास प्रतीत होतो. ह्या सर्व सिनेमांमध्ये मेहमूद पंचमला त्याचे भारतीय आणि पाश्चात्य संगीतावर सारखेच असलेलं प्रभुत्व दाखवायचे पूर्ण स्वातंत्र्य देतात. त्याचे फक्त संगीतच नव्हे तर त्याच्या एकूणच व्यक्तिमत्वाचा मेहमूदवर जबरदस्त प्रभाव होता. त्यामुळेच भूत बंगला मध्ये ते त्याला एक छोटासा roll सुद्धा देतात. त्याच सिनेमातलं अतिशय गाजलेलं दोघांचे शीर्षक गीत ह्याचीच साक्ष देणारे. सचिनदांनीं जर विरोध केला नसता तर ह्या सिनेमा नंतर आलेला पडोसन मध्ये पंचम सायरा बानू समोर नायकाच्या भूमिकेत दिसला असता. ह्याही सिनेमातल्या बंगाली बाबू ‘महेश’चं पात्र थेट पंचम वर बेतलेलं. पंचमचे त्या काळातले बंगाली पेहरावातले फोटो पाहिले तर आपल्याला ही गोष्ट मनोमन पटते. तसाच चष्मा, पांढरा कुर्ता , धोतर , बोलायची विनोदी बांगला लकब मूळचे हैद्राबादी मेहमूद भाईजान बेमालूम रित्या उचलतात. पंचमच्या सत्तरीतल्या दैदीप्यमान यशानंतर त्याच्या band-wagon वर आरूढ होणे वेगळं आणि काहीही नसतांना त्याला break देऊन त्याची करिअर घडवणे वेगळं.
त्यामुळे अशा अफलातून आणि सच्च्या पंचम-मित्राला सलाम ठोकल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही.
शीर्षक-संगीत :
शीर्षक संगीत म्हणजे चित्रपटाची श्रेय-नामावली पडद्यावर प्रकाशित होताना वाजणारे संगीत . काही वेळा गीत सुद्धा असू शकतं. गुलझार म्हणतात त्याप्रमाणे पंचमची फिल्मच्या माध्यमाची जाण जबरदस्त होती. त्यामुळे त्याच्या बऱ्याच चित्रपटांची शीर्षक संगीते खूप गाजली. शोले, दीवार ही काही आघाडीची उदाहरणं. गुगलने अगदी काल प्रदर्शित केलेल्या जाहिरातीत त्याच्या शीर्षक संगीताचा वापर मोठ्या खुबीने केलाय.
त्या २-३ मिनिटांच्या वेळात चित्रपटाच्या विषयाचा सारांश सांगणे आणि ते सुद्धा श्रेय-नामावलीच्या क्रमाशी (sequence) सुसंगत राहून , हे काही सोपं काम नाही पण पंचम ते लीलया करून जातो.
सुरुवातीच्या नाट्यमय संगीताच्या तुकड्यानंतर ज्याच्या आवाजाची प्रतीक्षा सर्व जण मोठ्या आतुरतेने करत असतात त्या नवजात बाळाच्या रडण्याच्या आवाजाने सुरुवात होते आणि सनईचे सूर “जिस लिये नैना तरस रहे है ” ची धून आळवतात. सरोद , सतार, चर्च बेल, गिटार चे संगीताचे तुकडे मीनाकुमारीच्या चित्रपटातल्या प्रवासाकडे बोट दाखवणारे.
सिनेमातले हे पहिले गाणे. धर्मेंद्रच्या प्रेमात पडलेल्या मीना कुमारीला चिडवणाऱ्या तिच्या सख्या. मुमताज त्यांच्यातील आघाडीची सखी. लता आणि उषाच्या स्वरातले द्वंद्वगीत. गाण्याची धून आणि वाद्यांचा वापर हा गाण्याच्या situation, स्थळ आणि स्त्री पात्रांना एकदम अनुरूप. अतिशय ताजी आणि तारुण्याने सळसळणारी. नायिकेभोवती पिंगा घालणाऱ्या व्हायोलिन,आनंदी आणि डौलदार accordion, mandolin चे चपळ झंकार आणि prelude च्या शेवटी बासरीने विचारलेला “किस कारण अं?” असा प्रश्न हे सर्वच आकर्षक.
ह्या गाण्याची खरी मजा ही गायिकांचा पडद्यावरच्या characters साठी प्रत्येक वेळी केलेला वेगवेगळा वापर. त्यामुळे गाण्याचा व्हिडिओ हा जास्त मजा आणणारा. सुरुवातीच्या मुखड्यातील मुमताजची पहिली ओळ लता तर त्याची पुनरावृत्ती मात्र उषा च्या आवाजात. लता आणि उषाच्या हार्मनीचा समूह-स्वरासारखा वापर सुद्धा लक्षवेधक.
जर गाण्याचा मुखडा मजेदार तर अंतरा पंचमच्या ख्यातीनुसार अधिकच मजेदार. दोन्ही अंतऱ्यांची सुरुवात लताच्या आवाजातल्या मीनाकुमारीच्या
“उई मर गयी अब क्या होगा बोल तू,
भेद ना मेरी सखी खोल तू”
ह्या लटक्या तक्रारीने होते. हे या गाण्याचे आणिक एक वैशिष्ट्य.
पूर्ण गाण्यात मीनाकुमारी एवढी एकच ओळ गाते. त्याला साथ देणारा ताल सुध्दा वेगळा आणि रोमांचक, तर धून ही ‘जोशीला’ सिनेमातल्या “किसका रस्ता देखे’ च्या अंतऱ्याची आठवण करून देणारी.
त्यानंतर लता-उषा चा समूह-स्वरातला खरा अंतरा सुरु होतो. Crossover ची सुरेख जुगलबंदी आणि “कजरा है रुठा हुआ, गजरा है टूटा हुआ, कजरा है रुठा हुआ..” ह्यात शेवटचा ‘गजरा है टूटा’ हे prelude प्रमाणे बासरी उचलते. असे शब्द आणि संगीत अजोड करायची करामत पंचमच्या बऱ्याच गाण्यात आढळते.
अंतरा म्हणजे कसा झरझर झरझर बदलत राहतो .. वेगवान पण घाई नसलेला तरीही कुठेही जास्त न रेंगाळणारा.. आनंद बक्षीजींचे पण शब्दांचे कसब वाखाणण्याजोगे
ह्या गाण्यात पंचम खरं तर एक मुख्य गायिका (लता किंवा उषा किंवा आशा ?) आणि समूह स्वर असे वापरू शकला असता. परंतु काहीतरी वेगळे करून दाखवण्याची पंचमला पहिल्यापासून खोड.
सिनेमातील हे दुसरे गाणे : मीना कुमारी आणि धर्मेंद्र चे प्रणय गीत. पंचमचा धर्मेंद्र साठी रफी चा वापर हा त्यावेळच्या परंपरेला धरून पण मीनाकुमारी साठी आशा ? हा प्रयोग त्या काळासाठी जरा जास्तच ठरावा. मीनाकुमारी म्हणजे लता हे त्याकाळातले जणू समीकरणच. काही संगीतकारांसाठी तर अभिनेता-अभिनेत्री कोणीही, अगदी एक्स्ट्रा तले असले तरी त्यांच्यासाठी अनुक्रमे रफी-लता चा वापर हा ठरलेला.
रोशनजींचे “हम इंतझार करेंगे” किंवा रवी यांचे “तोरा मन दर्पन कहलाये “असे दोन-चार अपवाद सोडले तर बाकी कुणी ‘मीनाकुमारी-लता’ हे समीकरण तोडायचा प्रयत्न केला नाही. पंचम मात्र हे समीकरण नुसतेच मोडत नाहीं तर आशा ला प्रणय गीत देतो. हिंदी सिनेमात सर्वात भावखाऊ काय असेल तर ‘प्रणय गीत’. ह्या प्रकाराला निसर्गरम्य स्थळांची पार्श्वभूमी, गोड धून सर्व काही मिळते. आणि अशा वेळी पंचम आशाला असे गाणे द्यायचे धाडस दाखवतो ते सुद्धा लता ह्या वेळी उपलब्ध असताना.
तेच ते पाळण्याबाहेरचे पाय !! आशा अर्थातच त्याचा तिच्यावरील विश्वास सार्थ ठरवते.
चित्रपटातल्या version मध्ये रफी ची सुरुवातीला एक जास्तीची आणि ad-lib ओळ आहे. रफीचा लगट करणारा मधाळ स्वर आणि त्याला तेवढ्याच मधाळ स्वरातले आशाचे उत्तर गाण्याला खूप कर्णमधुर करते. गाण्याची लय सुद्धा अगदी निवांत अनुभव देणारी. हीच संथ आणि कर्णमधुर लय व्हायोलिन आणि accordion गाण्याच्या interlude ( मुखडा आणि अंतराच्या मधला संगीताचा तुकडा) मध्येसुरेखपणे अखंडित ठेवतात. इतकेच नव्हे तर अंतऱ्याच्या हळुवारपणे वर जाणाऱ्या ओळी सुद्धा हीच लय उचलतात. आणि ज्यांना पंचमच्या बहुतेक गाण्यांत लय, धून, ताल ह्यात सतत होणाऱ्या बदलांची सवय आहे त्यांना वाटेल काहीतरी गडबड आहे. पण पंचम जणू काही तुमचे मन ओळ्खल्यागत गीताची लय पाठीमागून पुढे येणाऱ्या violins बरोबर झटक्यात वाढवतो आणि तुम्हाला खूष करून टाकतो. ह्या अचानक वाढलेल्या लयीचे मुखड्याच्या संथ लयीकडे उतरत जाणे, गिटारच्या झंकारीवर तिची सम पकडणे हे सुद्धा तितकेच विलोभनीय.
ह्याच खट्याळपणाचे आणि अंतऱ्याच्या जवळपास जाणाऱ्या धूनचे दर्शन पंचम आपल्याला ‘अनामिका’ मधील ‘लोगों ना मारो इसे’ या मुखडा विरहित गीतात घडवतो.
धर्मेंद्र आणि मीनाकुमारीचे यथावकाश होणारे लग्न आणि त्यांच्या पहिल्या रात्रीचे हे गझलच्या अंगाने जाणारे गाणे. हे गाणे वरवर पाहता रोशन किंवा मदन-मोहन चे गाणे असावे अशी शंका वाटणारे. पण पुन्हा पुन्हा ऐकताना त्यातील पंचमचे हळुवार touches जाणवतात. त्यातले रफीचे interlude च्या आधीचे “तुम्हे देखा” हे अंगावर मोरपीस फिरल्याचा अनुभव देणारे. interlude मधील धीरगंभीर चेलो, कुतूहल वाटायला लावणारी हरीजींची बासरी आणि खानदानी सतार,संतूर, सारंगी आणि मारुतीराव कीरांचा डौलदार तबला एक प्रणयी पण संयत वातावरण उभे करतात.
चित्रपटातली मेहमूद आणि मुमताजच्या भूमिका आणि त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी धर्मेंद्र-मीनाकुमारीच्या विरुद्ध टोक गाठतात आणि पंचमचे आपल्याला जास्त परिचित असलेलं पाश्चात्य आणि बांगला रूप दाखवतात. ‘मस्ताना होए’ हे त्यातलाच एक. खानदानाची सर्व बंधने झुगारून हे गाणे मुक्त अंगाने पुढे जाते. मुमताझच्या club मधल्या पार्टीत आमंत्रण नसताना बांगला मेहमूद आल्यावर मन्ना डे आशा च्या साथीत पंचम जी एक सांगीतिक धमाल उडवतो ती म्हणजे हे गाणे. आशाचे आंग्लाळलेले सूर आणि मन्नादांचं जाझ संगीतप्रकारावरचे बांग्लाळलेले हिंदी अक्षरशः बहार उडवते.
पंचमची trumpet, saxophone, ब्रास सेक्शन, cow bell , drums, पिकोलो बासरी ही मंडळी जोमाने कामाला लागतात. त्यातले drums चे सुरुवातीचे आणि आशा च्या “वोह है कोई दिवाना होये” च्या डुबकी नंतरचा बेस-गिटार आणि ड्रम्सचा तुकडा केवळ अप्रतिम.
आधी म्हटल्याप्रमाणे हे गाणे गाण्याच्या कुठल्याच मर्यादा पाळत नाही. गाण्याचं सुरुवातीचे संगीत मोठे ठेवताना interlude मात्र काही drum strokes वर भागवून पंचम अचानक गाण्याचा फक्त म्हणण्यापुरता अंतरा थेट बोसा नोव्हा ह्या ब्राझीलच्या ताल प्रकारात सुरू करतो आणि एक सुखद धक्का देतो . बोसा नोव्हा ही म्हणजे जॅझ चीच सुधारित आवृत्ती. आणि जॅझ तर काय पंचमच्या DNA मध्येच घुसलेला. त्यामुळें कुठल्याही गाण्यात पंचम बोसा नोव्हात सहज शिरून तितक्याच सहजपणे बाहेर पण पडतो. आणि हे सर्व एखाद्या खट्याळ मुलाने आईची नजर चुकवून अंगणात एक डाव खेळून लगेच घरी परतावं इतक्या सहजतेने. आणि अंतऱ्याची धून पण काय, मुखड्याचीच धून बेमालूमपणे एक पट्टी उचलून केलेली. इथे मन्ना डेंची entry होते आणि ज्या वेळी त्यांचे आणि आशा चे एका एका शब्दातले सवाल-जवाब चालू असतात तेव्हा समूह-स्वर मात्र पाठीमागे अंतऱ्याचीच धून आळवत असतो. असे अशक्यप्राय पण सुरेख मेळ घातलेले संगीत घटक फक्त पंचमकडेच अनुभवायला मिळतात.
ही तर फक्त सुरूवात वाटावी अशा ह्यापेक्षा जास्त अशक्यप्राय गोष्टी पुढे उलगडत जातात. मन्ना डेंचे हसवणारे “मै मार (खरं म्हणजे मौर) गया , मै डॉर गया” आणि त्यानंतरचे “औंधेरे में वोह मिल्ली थी , लॉडकीं नौही इठो बिल्ली थी” हे दोन भाषा आणि पाश्चात्य तालाची व्यवधाने सहज पेलते. त्यातले “बॅबा बॅबू” हे पंचमने म्हटलं असावं की काय अशी शंका उत्पन्न करणारे.
ह्यानंतर पाश्चिमात्य ड्रम्स आणि बांगला खोळ , पिकोलो आणि कर्नाटकी बासरी , sax आणि सनई यांची रोमांचक आणि उत्कंठावर्धक जुगलबंदी समोर येते. शेवटची सनई तर थेट भगवानदादांच्या ‘भोली सूरत दिल के खोटे’ पर्यंत घेऊन जाते.ड्रम्सच्या थिरकत्या beats पासून सुरू होऊन अलबेला च्या nostalgic तालावर संपलेला हा अविश्वसनीय प्रवास पंचमचे ‘नवाब छोटे और दर्शन बडे’ ची प्रचिती घडवतो.
मन्ना डे आणि रफीचे हे पुरुष द्वंदव गीत. यात खरंच द्वंदव आहे. आधी उल्लेख केल्याप्रमाणे संगीत आणि नृत्य वेडा मुमताज चा बाप धुमाळ आणि भारतीय आणि त्यात बांगला संगीताचा भक्त मेहमूद यांतले. मुमताज त्यांच्यात जो या नृत्य-गीत स्पर्धेत हरेल तो जिंकलेल्याची शागिर्दी स्वीकारेल अशी पैज लावते आणि ह्या स्पर्धेचं umpiring सुद्धा करते. परंतु पडोसन मध्ये किशोर आणि मन्ना डे यांच्यात जशी भारत-पाकिस्तानमधील क्रिकेट मॅचची कांटे की टक्कर होते तशी नसली तरी IPL मॅच सारखी मनोरंजक मात्र जरूर ठरते. दोघेही गायक शास्त्रीय दृष्ट्या कसलेले आणि किशोर सारखे मस्तीखोर नसल्यामुळे आपण कोण जिंकेल याच्या चिंतेपेक्षा त्यांच्यातल्या स्पर्धेचा पुरेपूर आनंद घेऊ शकतो. रफीसाठी हा प्रकार काय home-pitch च आहे पण मन्ना दा बांगला हिन्दी आणि शास्त्रीय अशी दोन्ही आव्हानं VVS Laxman च्या class मध्ये पेलतात.
बिंदादीन महाराजांचे बोल, बिरजू महाराजांचे नृत्य दिग्दर्शन आणि खूबसूरत मधल्या अशोककुमार यांच्या चपल आवाजातले “ता धिक ता ता धिक ता … खेलत भुज मेलत लपट झपट राधा …” या बहारदार sequence ची सुखद भेट ही स्पर्धा संस्मरणीय करतात. पंचमच्या वेस्टर्न गाण्यांप्रमाणेच त्याची भारतीय शास्त्रीय कलेवर आधारित असलेली गाणी सुद्धा तितकीच कसदार किंबहुना ह्यातील दिग्गजांपेक्षा काकणभर सरसच ठरतात.
ध्वनि-मुद्रिकेवर हे गाणे अगदी क्रूरपणे अर्ध्याहून अधिक छाटलेले दिसते. त्यामुळे पूर्ण साडे सहा मिनिटांचे गाणे फक्त सिनेमातच ऐकायला मिळते.
चित्रपटातल्या ज्या दोन गाण्यांची सर्वात जास्त चर्चा होते त्यातील एक आणि सर्वात अवघड गाणे. मीना कुमारीला जेव्हा ती आई होऊ शकत नाही हे कळते आणि आपली सासू आपल्या नवऱ्याचे दुसरे लग्न लावू पाहात आहे आणि आपला नवरा केवळ आपल्या प्रेमाखातर ते नाकारतो असे समजते तेव्हा त्याच्या मनातून उतरण्यासाठी ती ठरवून बेताल वागते. तिचा पेहराव, club मध्ये जाणे आणि दारू पिणे ( खोटे खोटे) यामुळे घरच्यांमध्ये आणि तिच्यात खटके उडू लागतात आणि या सर्वाचा कडेलोट म्हणजे हे गाणे ज्याची परिणती मीना कुमारी घरातून काढून टाकण्यात होते आणि तिचा उद्देश सफल होतो.
पंचमच्या नुसार चित्रपटात आधी हे गाणे नव्हतेच. फक्त एक प्रसंग होता त्यात मद्यधुंद मीनाकुमारी पार्टीमध्ये सर्वांसमोर अडखळत चालत आणि तसेच बोलत आपली कैफियत मांडते. पंचमने नुकतेच कलकत्त्याच्या क्लब मध्ये अशा तालावर आधारित Cabaret ऐकले होते. त्याने मेहमूदला सूचना केली की इथे एक गाणे टाकता येईल ज्यातून नायिका स्वतःला व्यक्त करेल. ठरलं. आणि ठरल्यानंतर केवळ दहा मिनिटात धून तयार, दोन दिवसात रेकॉर्डिंग आणि आठवड्याच्या शेवटी गाणे floor वर जाऊन चित्रित सुद्धा झाले. गाणं जर ऐकलं आणि पाहिले तर एवढ्या कमी वेळात होऊ शकेल ह्यावर विश्वासच बसत नाही. हा प्रसंग पंचमच्या शब्दात खाली मांडलाय..
courtesy : कौस्तुभ पिंगळे
“I was recently married and went to Calcutta. It was there that the seed of this tune was sown. I visited a fashionable restaurant in Park Street, in company of my friends. A European Cabaret star was performing there. She sang a French number which stirred me with its lilt and tune. Although I couldn’t understand a word of what she was saying, its rhythm, the twists were going through my mind for the whole evening. Driving home a tune came to my mind – on doubt inspired by the cabaret mood. I sang it for my friends and asked their opinion. They liked it….and that was that. I returned to Bombay the next day.
Here I dropped at the Mehboob Studio where shooting for ‘Chandan Ka Palna’ was going on. It was the same scene with Meena Kumari ( drunk ) but originally she was only acting, the song was not there. It was while watching Meena I remembered the tune I had prepared in Calcutta and realized how it would suit the scene like the proverbial glove. I contacted the director Ismail Menon and explained the situation. Soon we were sitting over a harmonium in the music room. And within 10 minutes the tune was ready. It was approved and I ran to the lyrics writer to fill in the words. Within two days it was recorded and by end of the week Meena was now enacting it. Such is the course of tunes, sometimes you take your brains for weeks on end and the inspiration fails to come. And sometimes by the coincidence of circumstances it gets ready in no time at all !”
पंचम आणि रमेश सिप्पी यांचे एकमेकांबरोबर मोजून पाच चित्रपट : सीता और गीता, शोले, शान, शक्ती आणि सागर. सर्व बहुचर्चित आणि हिट. दोघे ही perfection चा ध्यास घेणारे. त्यांच्या जादुई युतीची पाळं मुळं या सिनेमात आणि याच गाण्यात दडलेली आहेत. नुकत्याच एक interview मध्ये सिप्पी हे मांडतात. ते त्यांच्याच शब्दात आपण वाचूयात.
“There was a song in great comedian Mehmood’s film ‘Sharaabi sharaabi mera naam ho gaya” which was not greatly popular at the time. But having heard it I just felt here is a man of tomorrow. Here is a man who will take me to a new world. That’s how I made up my mind,” recalled Sippy.
काळाची आणि त्याच्याही पुढे असणारी पंचमची पावलं मेहमूद प्रमाणेच ओळखणाऱ्या सिप्पीना सलाम !
असे ऐतिहासिक गाणे गायला पंचम फक्त लतालाच बोलावतो. कारण अशी तारेवरची कसरत तीच करू जाणे. या आधी नशेतली गाणी आली, नाही असे नाही पण ती नशा फक्त गळ्यापर्यंत पोहोचणं वेगळं आणि ती गाण्याच्या रक्तात भिनणे वेगळे. असे गाणे म्हणजे फक्त “झराबी ” म्हटणे किंवा उचक्या देणे एवढंच नव्हे. गाण्याचा ताल, खरे म्हणजे बेताल, त्याचे अनपेक्षित चढाव आणि उतार , कधी मोठे आलाप तर कधी एक्दम बरेच शब्द म्हणणे, कधी अर्ध-पद्य “लेकिन खुदा की कसम आप बडे खुदगरज हो ” अशी मीना कुमारीची हुबेहूब केलेली नक्कल ह्यामुळे गाणे roller coaster चा अनुभव देतं. नुसती लताच नव्हे तर saxophone, गिटार , casta nets , आणि डोके गरगरावणारी हरीजींची बासरी सर्वच या अडखळत्या गाण्याला सुरेख हातभार लावतात.
सिनेमातले मेहमूद-मुमताजचे अजून एक item-song. कारण मुख्य कथेशी ह्या गाण्याचा फार कमी संबंध. जर मस्ताना होये मध्ये वाद्यांची जुगलबंदी आहे तर ह्यात गाण्यांच्या प्रकारातली (genre ). खरे तर boxing ची च match. ६०च्या दशकातल्या लवचिक मुमताजला साथ देणारी तितक्याच लवचिक आवाजातली आशा आणि हरहुन्नरी पण दुराग्रहि (adamant) बांगला मेहमूदला चपखल साथ देणारे मन्ना दा संगीतातले सर्व प्रकार cover करतात. इंग्लिश अंतऱ्यापासून ते रवींद्रनाथ टागोर ह्यांच्या ‘शे दिन दुजोने’ पर्यंत, पायाने ताल धरायला लावणाऱ्या “आओ ट्विस्ट करे’ पासून ते पंजाबी ताली-बाला गाना “ओईसा लॉयला एक दिवाना’, बांगला बाऊल गाण्या पासून ते पंचम च्या आवडत्या बोसा नोव्हा पर्यंत.
एकाच album मध्ये झालेले बोसा-नोव्हा चे हे दुसरे दर्शन. इतक्या वेळ तालात घडणाऱ्या त्याच्या दर्शनात आता गीतकार बक्षी जी सुद्धा सहभागी होऊन “बोसा नोव्हा बोसा नोव्हा सुनो” असे एक पूर्ण कडवे त्या ताल-प्रकाराला अर्पित करतात.
जिथे ह्या अवघड ताल प्रकारातले एक गाणे मिळायला मारामार तिथे पंचम ह्या एकट्या गीत-संग्रहात दोन गाण्यात त्याची जी उधळपट्टी करतो ती केवळ डोळे दिपवणारी.
मन्ना दांच्या ह्याच गाण्यातील शब्दांचा आधार घ्यायचा झाला तर सांगायचं तर
“ऐसा M.D. है कोई ph-phoren में ?”
गाण्यांच्या ह्या प्रवासाला चरम सीमेवर नेणारे हे ‘जोगिया’ रागावर आधारित असलेलं शीर्षक गीत. खऱ्या खुऱ्या (निदान त्या काळातल्या तरी) भारतीय नारी प्रमाणे मीना कुमारी असीम त्याग करते. तिच्या सासरच्या खानदानाला वारस मिळावा म्हणून संसारातून आपणहून बाजूला होऊन सवतीला वाट करून देते. आणि गंगेच्या किनाऱ्यावरील एक मंदिरात व्रतस्थ जीवन जगते. व्रत एकच . तिच्या सासरी बाळाविना सुना असलेला चंदनाचा पाळणा परत झुलावा. ह्यासाठी ती थेट गंगेलाच साकडे घालते.
या गाण्याच्या जन्माची कथा ७१च्या फौजी जयमालात सांगताना पंचम त्याच्या जिवलग दोस्त, बादल(भट्टाचार्य) च्या आठवणींत हरवून जातो. ती गोष्ट त्याच्याच आवाजात ऐकण्यासारखी.
पंचम रागाच्या शास्त्रीयतेच्या कधीच आहारी गेला नाही. त्याने गाण्याचे भाव-तत्त्व कायम जपले त्यामुळेच त्याची शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी कधीच बोजड वाटत नाहीत. ह्या गाण्यात सुद्धा पंचम ह्या जोगन ची अभिव्यक्ती मांडताना जोगियाचा फक्त आधार घेतो. पुन्हा एकदा लता. होय, ह्या संस्मरणीय सांगीतिक प्रवासाची सांगता तिच्याच दैवी आवाजानेच करतो. मीनाकुमारीच्या पात्राचे कारुण्य , तिचा ध्यास, स्वतःच्या पलीकडे जाऊन आल्या कुटुंबाचे चांगले होण्याची तिची आस हे लता फारच अप्रतिमरीत्या साकारते.
ध्वनी-मुद्रिकेवर जरी तीन कडवी असली तरी सिनेमात हे गाणे २+१+१ अशा चार अंतऱ्यात आहे. हे गाणे मीनाकुमारी च्या व्रताचा प्रवास दाखवणारे ठरतं. पंचमचा वाद्यांचा वापर अतिशय सुरेख आणि चपखल. गाण्यातील करूण सारंगी/ बासरी , पवित्रता दर्शवणारी सतार, मध्येच धर्मेंद्रच्या दुसऱ्या लग्नाच्या दृश्याला दिलेली पण करूणतेकडे झुकणारी सनई आपण समजू शकतो पण बऱ्याच ठिकाणी वापरलेला पाळ्ण्या वरच्या खेळण्याच्या किणकिणत्या आवाजाचा हळुवार आणि सुरेख वापर पंचमच करू जाणे !!
आश्चर्य वाटेल पण हे गाणे त्या वेळी सूर-सिंगार च्या पुरस्कारासाठी निवडले गेले होते , परंतू ज्युरी मधल्या एका झारीतल्या शुक्राचार्याने “आपण पंचमसारख्या एका पाश्चात्य संगीतकाराची प्रतिमा असलेल्याला हा पुरस्कार दिला तर आपल्या संस्थेची बेअब्रू होईल” हे कारण दिल्यामुळे शेवटी हा पुरस्कार दुसऱ्याच गाण्याला दिला गेला. काळाने पण या संगीतातल्या ढुढ्ढाचार्यांवर अजब सूड उगवला. ज्याला एकेकाळी पुरस्कार नाकारला त्याच आर.डी.बर्मनच्या नावे प्रत्येक वर्षी एका नवोदित संगीतकाराला पुरस्कार दिला जातो. केवढा हा विरोधाभास !!
आज पंचमच्या ७७व्या वाढदिवशी पंचमच्या ७ व्या चित्रपटाच्या अवलोकनाची त्याला ही छोटीशी (हो, त्याने मला व आपल्या सर्वांना जेवढे भरभरून दिले आहे आणि अजूनही तो देतोच आहे त्या मानाने) भेट अर्पण करतो. त्याची त्यावेळची लहान पावलं थोड्याच वर्षात संगीत-विश्वव्यापी कशी झाली आणि अजून ही वामन अवताराप्रमाणे त्यांचा आकार वाढतच आहे हे लिहिताना मन खरंच भरून येते. स्वतःचा अभिमानसुद्धा वाटतो की आपण त्याच्या दैदीप्यमान युगाचे नशीबवान साक्षीदार आहोत. आजच्या संगीतविश्वात त्याची उणीव पदोपदी जाणवते. आणि त्यातूनच देवाला म्हणावंसं वाटतं
” सूना पडा है संगीत का पलना ..”
अशी काही तरी जादू ची कांडी फिरव की
“उस पलने में फिरसे झूले सचिनदा और मीरादी का ललना “
सुधीर कुलकर्णी
पंचममॅजिक.ऑर्ग