अमरप्रेम


समुद्रकाठच्या त्या अलिबाग गावात, आठवणी जिथुन चालु होतात त्या बालवयातील २-३ वर्षे गेली. पहिल्यांदा शाळेत प्रवेशही त्याच गावात झाला. वडिलांच्या नोकरीत दर २-३ वर्षानी अपरिहार्यपणे येणाया बदलीतलं ते छोटंसं देखणे गाव ३८ वर्षांपुर्वी अगदीच शांत होतं. आमच्या सरकारी निवासस्थानापासुन पाच मिनिटांवर सुंदर समुद्रकिनारा होता. रात्री घरी लाटांचा आवाजही येई.
शाळा, छोटीशी बाजारपेठ, समुद्रकिनारा, त्याला लागुन असलेली observatory ची टुमदार इमारत हे सगळं छोट्याशा परीघातच होतं. लांब होते ते गावातलं एकमेव चित्रपटग्रुह – ’महेश टॉकीज’. कॉलेजमधे शिकत असलेल्या माझ्या मोठ्या बहिणी तिथे अनेकदा सिनेमे बघत आणि घरी येऊन त्याबद्द्ल तासनतास गप्पा मारत. २५ मीटर बॅंड अर्थात रेडीओ सिलोन, विविधभारती लावुन गाणी ऐकत. घरातल्या छोट्या मुलीला सिनेमा पाहण्याची संधी क्वचित मिळायची, ती जय हनुमान, संपूर्ण रामायण, आशिर्वाद असले खास सिनेमे पाहण्यासाठी.
घरात बहिणी, त्यांच्या मैत्रिणी यांच्या गप्पांमधे सतत ऐकू येणारा राजेश खन्ना कोण ते पाहण्याची संधी अचानक आली. ’अमरप्रेम’ नावाच्या त्या कौटुंबिक चित्रपटासाठी आई, आजी यांच्याबरोबर ’महेश टॉकीज ची वारी झाली. ’अमरप्रेम’ नाव काही तरी भव्यदिव्य वाटलं तेव्हा. धुसर आठवणीतल्या त्या अमरप्रेममधे राजेश खन्ना पहिल्यांदा पाहीला. पण तेव्हा सगळ्यात लक्षात राहीला तो छोटा नंदू.

सावत्र आईचं वर्णन त्याआधी ऐकलं होतं गोष्टीच्या पुस्तकात, वाचलं ही होतं, तिचा दुष्टपणा, छ्ळ याबद्द्ल जे काही ऐकलं होतं ते पडद्यावर प्रत्यक्ष पाहिलं. नंदू, त्याची सावत्र आई आणि शेवटी मोठा नंदू मानलेल्या आईला घेऊन जातो, एवढीच पहिल्या अमरप्रेमची पक्की आठवण. ’बडा नटखट है’ हे एकच गाणं तेव्हा खूप दिवस लक्षात राहीलं. आनंदबाबु, पुष्पा यांचं नातं कळण्याचं ते वयच नव्हतं.
पुढे वयाच्या प्रत्येक टप्प्यावर ’अमरप्रेम’ भेटतच राहीला. थोडं मोठं झाल्यावर ’अमरप्रेम’ च्या गाण्यांकडे खरय़ा अर्थानी लक्ष गेलं. तेव्हा छायागीत मधे ’चिंगारी कोई भडके’ हे गाणं सारखं लागायचं. पाठमोरी पुष्पा, नावेत हलणारा कंदील, त्याचा पिवळा प्रकाश आणि तिथे असुन नसल्यासारखे स्वत:च्याच नादात किशोरदांच्या स्वरात गाणारे आनंदबाबु. कितीदा पाहिलं ते गाणं. त्यामानानी बाकीची गाणी छायागीत मधे क्वचितच दिसत. जणु दूरदर्शनचा अमरप्रेम मधलं हे एकच गाणं दाखवण्याजोगं आहे, असा समज होता.
नंतर कॉलेजमधे असताना रत्नागिरीला अमरप्रेम मॅटिनीला पाहिला (तेव्हा मॅटिनीला जुने चित्रपट लागत) अमरप्रेम मॅटिनीला पाहिला त्याच्या दोन दिवस आधी रेग्युलर शो मधे नव्यानी आलेला अमिताभ बच्चन यांचा ’कालिया’ पाहिल्याचं स्मरतं. थोडक्यात राजेश खन्ना यांचं सुपरस्टारपद तोपर्यंत अमिताभ यांच्याकडं जाउन जुनं झालं होतं.
अमरप्रेम दुसरय़ांदा पुर्ण पाहिला तेव्हा स्वाभाविकच नंदू पेक्षा आनंदबाबु, पुष्पा यांच्या नात्याचा अर्थ, दोघांचे अभिनय, अर्थपूर्ण संवाद, शक्तीदांचे सेट्स, आनंद बक्षींची गीतं आणि तोपर्यंत मनावर पुर्ण कब्जा घेतलेलं आर. डी. बर्मन यांचं संगीत याचं एकत्रित संमोहन झालं. लताबाईंच्या “रैना बिती जाए’ ने खुप आधीच झोप उडवली होती. या गाण्यातला पहिला आलाप, त्या स्वरातुन उठलेली वेदना अस्वस्थ करायची. आनंद बक्षींची ’कुछ तो लोग कहेंगे…सीता भी यहा बदनाम हुई’ अशा पंचलाइनची गाणी ऐकून तेव्हा त्याला दाद जायची. टायटल बरोबरच येणारं  ’डोली मे बिठाई के कहार” तेव्हा नीट ऐकलं आणि मग संवेदनेत कायमचं जाऊन बसलं.
तरीसुद्धा अमिताभ नावाच्या झंझावातापुढे त्याच्या action पटांपुढे तेव्हा ’अमरप्रेम’ खुप भाबडा वाटला. तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे बरोबरच्या मैत्रिणींनी राजेश खन्नाची टर उडवलेली आठवते. तरी सुद्धा शक्ती सामंता नावाचे दिग्दर्शक यातुन काहीतरी महत्वाचं भाष्य करत होते हे जाणवत होतंच.
मधे बरीच वर्षे गेली. अमरप्रेमची गाणी ऐकू यायची , कधितरी टिव्हीवर दिसायची. “रैना बिती जाए’ चा नंबर मनात अजुन पहिलाच होता. पण आता लहानपणी आवडलेल्या ’बडा नटखट’ गाण्यानी मनात घर केलं. पंचमदांनी काय विचारांनी ही परिपक्व चाल बांधली असेल, लताबाईंनी कुठल्या भावनेनी ती गायली असेल याचं आश्चर्य वाटायचं. ठुमरी, दादरे त्यातला श्रुंगार नटवणारय़ा खमज रागात पंचमदांना दिसलेली वात्सल्याची ही छटा अक्षरश: मनाला भुरळ घालते.
अमरप्रेम आणि गाणी याची भेट अधुनमधुन होतच राहिली. अलीकडेच रविवारी दुपारी अमरप्रेम दूरदर्शनवर पहिल्यापासून पाहण्याचा योग आला.  titles मधे बिभुतीभुषण बंदोपाध्याय यांचं नाव आलं. सत्यजित राय यांचे पथेर पांचाली, अपुर संसार असे चित्रपट ज्यांच्या कथांवरून पडद्यावर आले त्याच महान बंगाली लेखकाची अमरप्रेम ही कथा. हिंदी चित्रपटांच्या ठरलेल्या साच्यापेक्षा थोड्या वेगळ्या अशा कथेचं बीज इथे होतं तर!
वाढत्या वयानी, बदललेल्या संवेदनांनी अमरप्रेमशी आता वेगळं नातं जोडलं. छोटा नंदू, त्याच्यावर वात्सल्याचा वर्षाव करणारी पुष्पा नव्या अनुभवानी सामोरे आले. आनंदबाबु, पुष्पा यांचं उतारवयातलं समांतर आयुष्य, आपापल्या प्राक्तनाचे भोग शांतपणे सोसत दोघांचाही अटळ वार्धक्याकडे जाणारा प्रवास, अनपेक्षितपणे नंदूनी त्या गावात येणं आणि मानलेल्या त्या आईला घरी कायमचं घेऊन जाणं हे सारंच फार ह्र्द्य वाटलं.
सिनेमाच्या शेवटी नंदू आईला टांग्यातुन घेऊन जातो. दूर्गापुजेच्या उत्सवाची सुरुवात होत असते. नंदूचं आईला घेऊन जाणं आणि टांग्याच्या बाजूला दूर्गेच्या प्रतिमा घेऊन जाणारे भाविक याचे सहज येणारं द्रुश्य प्रतिकात्मक बनतं. अमरप्रेम मधलं हे शेवटचं द्रुश्य पाहताना माझ्या डोळ्यांसमोर नेहमी धुकं जमतं, ते तेव्हड्या पुरतं की लहानपणापासुन बरोबर आलेल्या सगळ्या आठवणींचं असतं तेव्हडंच मला कळत नाही….
प्रभा जोशी